’26 व्या वर्षी खासदार, 32 वर्षी मंत्री…, पायलटांना काय दिलं नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील सत्ता संघर्षमध्ये काँगेसने मोठा निर्णय घेत उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले आहे. सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. त्यांची मनधरणी करण्यात आली मात्र, काँग्रेस पक्षाला यामध्ये अपयश आलं. यामुळे काँग्रेसने त्यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली असल्याची माहिती काँग्रेसचे माध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी बैठकीनंतर दिली.

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर काँग्रेसचे माध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याची घोषणा केली. पायलटांवर केलेल्या कारवाईची माहिती देताना, सुरजेवाला यांनी पयलट यांना पक्षाने अगदी कमी वयात खूप काही दिले होते. याची आठवण करून दिली.

जयपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले, आम्हाला एका गोष्टीचे दु:ख आहे, की उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही आमदार आणि मंत्री भ्रमित होऊन भाजपच्या षडयंत्रात अडकले आणि काँग्रेस सरकार पाडण्यासाठी तयार झाले.

सुरजेवाला यांनी यावेळी म्हणाले की, सचिन पायलट यांना काँग्रेसने कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. सचिन पायलट यांना अगदी कमी वयात जी राजकीय ताकद दिली गेली, तेवढी ताकद कदाचित कुणालाही दिली गेली नसेल. 2003 मध्ये सचिन पायटल राजकारणात आले. यानंतर 26 वर्षाचे असतानाच 2004 मध्ये त्यांना काँग्रेसने खासदार बनवले. 32 व्या वर्षी त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले.

34 व्या वर्षी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आणि 40 व्या वर्षी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव त्यांच्यासोबत होता. त्यामुळेच त्यांना हे सर्व मिळाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.