‘कोरोना’मुळे तब्बल 1 लाख ऊसतोड मजुरांचे सुरक्षित स्थलांतर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले असून वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्‍या नागरिकांना घरी पोहोस्त करण्यासाठी शासनाकडून मदत केली जात आहे. राज्यशासन आणि साखर कारखाने यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या 1 लाख 31 हजार ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी, घरी सुखरूपरीत्या पोचविण्यात यश आले आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील हे कामगार आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात 51 हजार कामगार परतले आहेत. त्यांना पुन्हा घरात 14 दिवस स्वतंत्रा ठेवण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उसतोड कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी त्यांची जागेवरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एवढ्या मोठया संख्येने कामगारांचे स्थलांतर केले गेले, तरी एकही करोना संशयित कामगार आढळला नाही, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. लॉकडाउनमुळे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांतील 38 साखर कारखान्यांच्यावतीने ऊसतोडीसाठी गेलेले 1 लाख 41 हजार कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अनेक ठिकाणी शेतातच अडकून पडले होते.

पालावर राहणार्‍या या कामगारांना परत घरी जायचे होते. त्यासाठी ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी खास नियोजन करण्याची सूचना त्यांच्या विभागाला आणि अन्य शासकीय यंत्रणांना करण्यात आली. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी आणि साखर कारखाने यांच्याशी समन्वय साधून या कामगारांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात, त्यानंतर गाव आणि शेवटी घरापर्यंत कसे पोचवायचे, याचा आराखडा तयार करण्यात आला.

बस प्रवासाचे खास मार्ग निश्चित करण्यात आले. कामगारांना जागेवरून हलविण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. साथसोवळ्याची खबरदारी घेऊन त्यांची बसमध्ये व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमेवर पोचल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या सहकार्याने पुन्हा तेथे त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.