कडकनाथ फसवणूक प्रकरणी, तिघे अटकेत सांगलीतील आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा जिल्ह्यातील फलटण येथील फूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. तिघांनाही 17 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

फूड बर्ड अ‍ॅग्रो प्रायव्हेट कंपनीचे संचालक राहुल ठोंबरे, सुखदेव शेंडगे (दोघे रा. सरडे, ता. फलटण, सातारा) आणि सचिन करे (रा. माळेगाव, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कंपनीच्या एका युनिटमध्ये 75 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास कंपनी 220 कडकनाथ कोंबड्या व दहा महिन्यांचे कोंबडी खाद्य, औषध व भांडी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. सभासदांकडून एका वर्षात कडकनाथ कोंबडीची एकूण 8500 अंडी 2 लाख 38 हजार रुपयांना कंपनी खरेदी करणार असल्याचेही कंपनीने सांगितले होते. तसेच एका वर्षात 2 लाख 38 हजारांचा फायदाही गुंतवणूकदारास होईल, असे आमिष दाखवण्यात आले होते. सांगलीतील गुंतवणूकदारास फलटण येथे जाण्यास त्रास होतो म्हणून सांगलीतील शंभरफुटी रस्ता परिसरात कंपनीचे कार्यालय उघडले होते.

त्यानंतर जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले होते. त्याची रक्‍कम 1 कोटी 54 लाख 66 हजार रुपये इतकी होती. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार कंपनीचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/