सांगली : तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   सांगलीमध्ये ( Sangli) धक्कादायक घटना घडली आहे. येथील काळी खाण परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून ( Murder) करण्यात आला. प्रदीप राजू हंकारे ( Pradeep Raju Hankare) असे मृत तरुणाचे नाव आहे. ३० वर्षीय तरुण मिरजमधील ( Miraj) रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून, यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगलीतील विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रदीप हा प्लम्बिंगचा व्यवसाय करत होता. मंगळवारी कामानिमित्त तो घराबाहेर पडल्यानंतर दिवसभर बाहेर होता. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास त्याने घरात आईला फोन करून उशिराने येणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या काही मित्रांनी घरी फोन केला. प्रदीप दारू पिऊन विश्रामबाग परिसरात पडला असून, त्याला घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी त्याच्या घरी फोन करून त्याचा मृतदेह काळ्या खणीजवळ सापडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्यात दगड घालून आणि धारधार शास्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उपअधीक्षक अजित टिके आणि निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, प्रदीपच्या मित्रांनीच त्याचा खून केला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर या घटनेत मंगळवारी रात्री त्याच्या घरी फोन करणार्‍या मित्रांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना केल्याचे उपअधीक्षक टिके यांनी सांगितले. मृत प्रदीप हंकारे हा विवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यामुळे लवकरच गुन्हेगारांचा शोध लागण्याचे आश्वासनदेखील पोलिसांनी दिले आहे.