सांगलीजवळ झालेल्या भीषण अपघातात चाकणमधील तिघांचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

देवदर्शन करुन पुण्याकडे परत येताना मोटारीवरील नियंत्रण सटल्याने मोटार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील चाकण येथील तीघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कामेरी (सांगली) येथील वेदांत मंगल कार्यालयासमोर गुरुवारी (दि.७) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला.

धनंजय पठारे (वय 28), दत्ता जाधव (25 वर्ष) व अमोल लक्ष्मण मुंगसे (वय 24 वर्ष) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर धीरज विजय मुंगसे (२१, बिरजवाडी) व रुपेश गणपती पठारे (२५, पठारेवाडी) हे जखमी झाले असून यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मृत व जखमी तरुण मित्र व जवळचे नातेवाईक आहेत. ते नृसिंहवाडी येथे श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी बुधवारी (दि.६) रात्री आले होते. मंदिर परिसरातच त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी पहाटे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते मोटारीने (क्र. १४ एफएम ४०४७) पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. धनंजय पठारे हा गाडी चालवत होता. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कामेरी गावाजवळ गेल्यानंतर धनंजयचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव मोटार जोरात झाडावर जाऊन आदळली. यामध्ये धनंजय पठारे, अमोल मुंगसे जागीच ठार झाले, तर दत्ता जाधव याचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कुरळप पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.