सांगलीत वृद्ध महिलेचे ऑक्सिजनकीटसह मतदान

विटा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात आज सकाळपासूनच नागरिकांनी उस्फुर्त मतदान करायला सुरुवात केली. खानापूर तालुक्यातील गार्डी येथील स्वतंत्र्य सैनिक कै. सुबराव अप्पाजी बाबर यांच्या पत्नी कुसुम बाबर (८५) यांनी ऑक्सिजन किटसह मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

कुसुम बाबर गेल्या दोन वर्षांपासून ऑक्सिजनवर आहेत. तरी त्यांनी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गावातलया काही तरुण मंडळींनी त्यांना ऑक्सिजन किटसह मतदान केंद्रावर आणले. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मदत केली. लोकशाहीपुढे त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला. संपूर्ण गाव आणि परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.

याबरीबरच बाबर यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून ते आपण बजावलेच पाहिजे असा संदेश दिला. दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.