Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

सांगली :  पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील समर्थकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत पांडुरंग जनार्दन काळे (वय-57) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. या घटनेमुळे बोरगावामध्ये तणावाचे वातावरण असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला आहे.

बोरगावातील पांडुरंग काळे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळे यांचा खून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे दोनजण जखमी

उपसरपंच निवडीच्यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत शिवसेनेचे पांडुरंग काळे यांचा खून झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन सदस्य गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली असून गावात तणावाचे वातावरण आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटातील समर्थक एकमेकांना भिडले. काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.