‘कोरोना’बाधित आरोपीने रुग्णालयातून ठोकली धूम, मिरजेतील दुसरी घटना, पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केेेलेल्या चोरट्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या चोरट्याने सोमवारी (दि. 4) पहाटे रुग्णालयाच्या बाथरुममधून धूम ठोकली. चोरटा रुग्णालयातून पळ काढल्याने आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांची तारांबळ उडाली आहे. मिरज व सांगली परिसरात नाकाबंदी करून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान कोरोनाबाधित चोरटा रुग्णालयातून पळून जाण्याची दुसरी घटना घडली आहे. चार महिन्यांपूर्वी एका चोरट्याने याच रुग्णालयातून पळ काढला होता. आता पुन्हा एकदा चोरट्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याने पोलिसांच्या बंदोबस्तावर शंका उपस्थित केल्या जात आहेत.

केरामसिंह रमेश मेहाड (वय 20, रा. मध्यप्रदेश) असे पळालेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केरामसिंह मेहाड याच्यासह चौघांच्या टोळीला चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 24 डिसेंबर रोजी कुपवाड येथून अटक केली होती. उत्तर प्रदेशातील या टोळीने सांगलीसह सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली होती. चौकशीदरम्यान प्रकृती खालावल्याने टोळीतील केरामसिंह याला पोलिसांनी उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. करोना चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.

सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तो रुग्णालयातील बाथरुममध्ये गेला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाथरुमचे दार ठोठावले, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यानंतर त्यांनी बाहेर जाऊन बाथरुमची खिडकी पाहिली असता, खिडकी तोडून तो पळून गेल्याचे लक्षात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. परिसरात शोध घेतला, मात्र पळून गेलेल्या चोरट्याचा सुगावा लागला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.