Sangvi News : करसंकलन कार्यालयात मनसेचे आंदोलन

सांगवी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांगवी करसंकलन कार्यालयामध्ये गेली दीड महिन्यापासून प्रशासन अधिकारी उपलब्ध होत नसल्याने बुधवारी (दि.20) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर संकलन कार्यालयाकडे जाब विचारण्यात आला. त्याचबरोबर तेथील प्रशासन अधिकाऱ्याच्या खुर्चीला पुष्पहार वाहून त्या खुर्चीचा सत्कार करण्यात आला.

मागील दीड महिने अनेक नागरिकांच्या मनसेकडे असंख्य तक्रारी येत आहेत. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निळख येथील नागरिक या ढिसाळ कारभाराला त्रस्त झाले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तिथे वारंवार भेट देऊन सुद्धा हेच चित्र पहावयास मिळत होते. अखेर आज संबंधित अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीचा प्रतिकात्मक रूपाने सत्कार करण्यात आला आहे. यापुढे जर कायमस्वरूपी प्रशासन अधिकारी मिळाला नाही तर मनसेच्या वतीने अधिकारी मिळेपर्यंत पिंपरी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी उपाध्यक्ष राजू सावळे तसेच अलेक्झांडर आप्पा मोझेस, सुरेश सकट, विशाल पाटील, महेश केदारी, मंगेश भालेकर, अनिल भुजबळ, प्रदीप गायकवाड, रुस्तम इराणी इ. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.