Loksabha : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणूकीच्या मैदानात

'या' मतदार संघातून लढवणार निवडणूक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर हे देखील निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून ते निवडणूक लढवणार आहेत. संजीव भोर यांनी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर भोर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पिचलेल्या समाजाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणूकीच्या मैदानात

या बैठकीदरम्यान बोलताना संजीव भोर म्हणाले, ‘आपण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यात बैठका घेतल्या. समाजाच्या सर्व घटकातील लोकांचं मत आम्ही जाणून घेतलं. प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे, असं मत सर्व घटकातील लोकांकडून मिळालं. म्हणून शेतकरी, कष्टकरी, पिचलेल्या समाजाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी पुढे येत आहे.’

संजीव भोर यांनी निवडणूकीसाठी उभे असलेले संग्राम जगताप आणि सुजय विखे हे धनदांडगे असल्याचा आरोपही यावेळी केला आहे. एवढेच नाही तर जनतेला त्यांचे प्रश्न मांडणारा उमेदवार हवाय आणि तो आपण स्वतः असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

संजीव भोर यांच्याविषयी…

  • अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरण आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संजीव भोर राज्याला परिचित झाले.
  • लाखोंच्या संख्येत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी ५० पेक्षा जास्त मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्च्याचे संजीव भोर समन्वयक आहेत.
  • आता भोर निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे अहमदनगर येथे ‘मराठा क्रांती मोर्चा’ निवडणुकीचा मुद्दा होणार असे चित्र आहे.