अविश्वसनीय ! सोलापूरातील मुस्लिम कुटूंबांनं ‘लग्नपत्रिका’ छापली चक्क ‘संस्कृत’मध्ये

सोलापूर, पोलीसनामा ऑनलाइन – अक्कलकोटमध्ये एक लग्नपत्रिका संस्कृतमध्ये छापून नातेवाईकांना वाटण्यात आली. एकीकडे संस्कृत लोप पावत असताना हा प्रयत्न उल्लेखनीय आहे. संस्कृत भाषेसाठी आयुष्य वेचणारे अक्कलकोट तालुक्यातील ज्येष्ठ संस्कृत पंडित दस्तगीर बिराजदार यांनी आपल्या नातवाची लग्नपत्रिका संस्कृतमधून छापली आहे. हा त्यांचा पहिला प्रयत्न नाही. संस्कृतमध्ये पत्रिका छापणारी त्यांच्या कुटूंबातील ही तिसरी पिढी आहे. मागील तीन पिढ्या जपलेल्या या प्रयत्नामुळे त्यांचे समाजात कौतूक होत आहे.

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी आपल्या बंधूंच्या लग्नाची पत्रिका देखील संस्कृत भाषेतूनच छापली होती. परंपरागत पिढी दर पिढी त्यांच्याकडून लग्नाची पत्रिका संस्कृतमध्ये छापून संस्कृतचा प्रचार करण्याचा आणि संस्कृत जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही परंपरा पुढे सुरु ठेवत त्यांनी आपल्या नात डॉक्टर समीन हिच्या लग्नाची पत्रिका देखील संस्कृतमध्ये छापली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 2 वर्षांनी त्यांनी आपला नातू अजीम नवाज यांच्या लग्नाची पत्रिका देखील संस्कृतमध्येच छापली आहे.

येणाऱ्या रविवारी सोलापूरात हा विवाह सोहळा पार पडेल. पंडित गुलाम दस्तगीर यांनी नातवाच्या लग्नाची पत्रिका संस्कृतबरोबच उर्दू, मराठी, इंग्रशी अशा एकूण चार भाषेत छापली. सहा दशक पंडित बिराजदार संस्कृत भाषा आणि साहित्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यांनी संस्कृतमध्ये विपुल लिखाण केलं आहे, आपल्या व्याख्यानातून देखील ते संस्कृतचा प्रचार करतात. एवढंच काय तर त्यांनी पवित्र कुराणाचे देखील संस्कृतमध्ये अनुवाद केला आहे. कुरणाबरोबरच अनेक इस्लामी ग्रंथांचे, तसेच रामायण – महाभारत, वेद यांच्यासह काही उपनिषदांचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/