मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

सुढाळ ढाळाचे मोती अष्टै अंगे लवे ज्योती | जया होय प्राप्ति तोचि लाभे ||१|| हातीचे निधान जाय मग तूं करिसी काय | पोळलियावररी हाय निवऊ पाहे ||२|| अमृते भोजन घडे काजियाने चूळ जोडे | मग तये चरफडे भिती नाही ||३|| अंगा आला नाही घावो तंव ठाकी येक ठावो | बापरखुमादेविवर विठ्ठलु नाहो  ||४||

संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, अति सुंदर पाणीदार मोती जसे असावे त्याचप्रमाणे हे मनुष्यशरीर आपल्याला प्राप्त झाले आहे. मनुष्यशरीरच भगवत्प्राप्तीचे साधन आहे. अशा या सोन्यासारख्या शरीराचा उपयोग भगवतदर्शनाकरिता, भजनाकरिता, नामस्मरणाकरिता करावा असे माऊली म्हणतात. माऊली पुढे म्हणतात की, शरीराची अंगकांति ही पांडुरंगाच्या पुढे साष्टांग नमस्कार घालण्याची म्हणजे नम्र होण्याची ज्योतच आहे. ज्याला हे भाग्य लाभेल, त्यालाच पांडुरंगाची प्राप्ति होईल. असे जर केले नाही तर हा मुष्यशरीररूप ठेवा हातातून एकदा का गेला, तर तूम्ही काय करणार ? पोळल्यानंतर हाय हाय करण्याचा काय उपयोग ? दुसरे असे समजा की एकदा अमृताचे भोजन मिळण्याचा योग आलेला गेला आणि नंतर चूळभर भाताची पेज पिण्याचा जर प्रसंग आला, तर नुसतें मनातल्या मनात चरफडत बसावे लागेल. याशिवाय दुसरा उपाय काय आहे ? दुसरा उपाय काही नाही. याकरिता मृत्यूचा घाव अंगावर आला नाही, तोपर्यंतच जगाचा अधिपती जो रखुमादेवीवर बाप विठ्ठल त्याची प्राप्ती करुन घ्या, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.