‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

येता-जातां हरि हरि हरि वाटे॥
नाम तें चोखटे स्मरा मुखीं||१||

हंसता-खेळता घरिं-दारी पारीं ॥
मुखी हरि हरि म्हणे का रे||२||

खाता-जेविता अन्नतृप्ति सारी॥
सांडी-मांडीहरि सर्वकाळ||३||

नामा म्हणजे नामीं अस्ति-नास्ति ठसा॥
केशव हरी सन्मुख तुम्हां दिसें||४||

या अभंगात संत नामदेवराय आपल्या लक्षात आणून देताहेत की, परमार्थ करणं ही केवळ साधुसंतांना शक्य असलेली गोष्ट आहे असं नाही, तर ती तुम्हा-आम्हा, आपणा सर्वांच्या आटोक्यातली ही आहे.

नामदेवराय आपल्याला अगदी सोप्या भाषेत उपदेश करतात. ते म्हणतात, भक्ती करण्यासाठी कोणतेच उपचार वा परिश्रम करावे लागत नाही. ती अगदी सहज करता येते. घरीदारी असताना, जीवनातील विविध व्यवहार करताना, जबाबदाऱ्या पार पाडताना. आपण सहजरित्या भगवंताची भक्ती करू शकतो. केवळ देवाचे नाव घेणं ही देखील भक्तीच आहे. भगवंताचं नामस्मरण केल्यावर प्रत्यक्ष देवच आपल्या समोर येऊन उभा ठाकतो, असं नामदेवराय म्हणतात.

एकनाथी भागवतात शुकाचार्य जनकराजाला नामचिंतनाचं महत्व सांगत आहेत, शुकाचार्य म्हणतात, जेवढी नामाची शक्ती । तेवढे पाप नाही त्रिजगती । नामापाशी चारी मुक्ती । जाण निश्चीती विदेहा ।।

या ओवीमध्ये शुकाचार्य यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भगवंताच्या नामसमरणात एवढी शक्ती आहे की नामसमरण केल्यास पाप अजिबातच शिल्लक राहत नाही. तेवढं पापच या जगात नाही.

ज्ञानोबाराय म्हणतात, नाम जप यज्ञ तो परम । बाधू न शके स्नानाधी कर्म । नामे पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थे ।।

नाथ महाराज म्हणतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरीनाम जपता घडे ।।
एक कोटी यज्ञ केल्याचं फळ आणि भगवंताचं भक्ती भावाने घेतलेल्या नामच फळ सारखंच.

तुकोबा म्हणतात, नाम घेता वाया गेला । ऐसा कोणी ऐकीला ।।

नामाच्या चिंतने । बारा वाटा पळती विघ्ने ।।

मग तुम्ही विचार करा, नामामध्ये किती मोठी शक्ती आहे. ते आपल्याला सहज घेता येते. म्हणून प्रत्येकाने भगवंताचे नामसमरण करावे.