मराठवाड्याची तहान भागणार : जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन  – अहमदनगर आणि नाशिक  धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग आता  मोकळा झाला आहे. अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत फेटाळून लावली आहे. आता  8 टीएमसी पाणी  मराठवाड्याला मिळणार आहे.
तहानेने व्याकुळ झालेल्या  मराठवाड्याला तहान भागवण्यासाठी जायकवाडी धरणात 30 ऑक्टोबरला सकाळी पाणी सोडण्यात येणार होते. मात्र जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  तीव्र विरोध केला. त्यामुळे विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. दरम्यान कोर्टाने 31 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली होती.
इतकेच नव्हे तर नाशिकमधील गंगापूर आणि दारणा , आणि अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचे  नियोजनही  करण्यात आले होते. मात्र  आज सुप्रीम कोर्टाने विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे अहमदनगर आणि नाशिक  धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 विविध धरणांमधून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. मुळामधू  १.९० टीएमसी, प्रवरामधून  ३.८५ टीएमसी , गंगापूर धरणातून  ०.६० टीएमसी, दारणा धरणातून २.०४ टीएमसी, पालखेड समुहातून  ६० टीएमसी असे  एकूण  ८.९९ टीएमसी  पाणी सोडण्यात येणार आहेत.