‘शाळा-कॉलेज’ कधी सुरु होणार ? केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलं ‘हे’ नवं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसमुळे देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील शाळा, कॉलेज, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून चार दिवसात संपणार आहे. त्यामुळे आता काळा कॉलेज कधी सुरु होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मागील काही दिवसांपासून 15 जून पासून शाळा महाविद्यालये सुरु होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवं स्पष्टीकरण दिलं आहे. शाळा-महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आलेला नाही असं गृहमंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. तसे कोणतेही निर्देश राज्यांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील अनेक शाळांचं क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात राज्यांतील शाळा महाविद्यालये 15 जून पासून सुरु होणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे शाळा महाविद्यालय 15 जूनला सुरु होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याची घोषणा केली. त्यानंतर पहिल्यांदा लॉकडाऊन 3 मे पर्यंत आणि नंतर 17 मे पर्यंत वाढविण्यात आला. या कालावधीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आला. चिनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात सध्या 1.40 हजाराच्या पुढे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे.