Coronavirus : आध्यामिक ‘गुरु’ बनले ‘कोरोना’चा ‘सुपर’ प्रसारक ! बलदेव सिंह यांचा ‘मृत्यु’, 40,000 गावकरी ‘क्वारंटाईन’

चंडीगड : पोलीसनामा ऑनलाइन –  बलदेव सिंह या ७० वर्षाच्या शीख आध्यामिक गुरुचा कोरोनाने मृत्यु झाल्यानंतर त्यांनी ज्या २० गावांमध्ये फिरुन प्रवचने केली. त्या गावांंमधील ४० हजार नागरिकांना सक्तीच्या होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आल्याने पंजाबात एकच खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये कोरोनाचा फैलाव करणारे म्हणून बलदेव सिंह यांची ओळख झाली आहे. गेली अनेक वर्षे हजारो अनुयायांचे निस्सीम श्रद्धास्थान असलेले हे गुरु आता मृत्युनंतर मात्र कोरोसारख्या महाभयंकर साथीचा सुपर प्रसारक म्हणून हेटाळणीचा व तिरस्काराचा विषय बनला आहे.

बंगा जिल्ह्याचे रहिवासी असलेले बलदेव सिंह युरोपमधील कोरोना साथीचे केंद्रबिंदू ठरलेल्या इटली आणि जर्मनी या दोन देशांचा दौरा करुन आले होते. ते आले तोपर्यंत भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. त्यांना जिल्हा प्रशासनाने बाहेर कुठेही न फिरता घरातच क्वारंटाईन मध्ये राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ते झुगारुन बलदेव सिंह २ सहकार्‍यांना घेऊन अनेक दिवस गावोगाव प्रवचने करीत फिरत राहिले.

त्यानंतर ते आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. १८ मार्च रोजी बलदेव सिंह यांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरु करण्यात आली. त्यात जवळपास त्यामुळे तब्बल २३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यात त्याच्या परिवारातील ३ मुले, २ मुली, ५ नातवंडे, २ सुना, २ सहकारी, सरपंच यांचा समावेश आहे. त्याच्या परिवारातील १४ जणांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले आहे. पंजाब सरकारने त्यांनी जेथे जेथे प्रवचने दिली. त्या २० गावे व त्यातील ४० हजार नागरिकांना होम क्वारंटाईनचा आदेश दिला आहे. ही गावे पूर्णपणे सील केली आहे.

रविवारी होशियारपूरमधील मोरांवाली येथील ६० वर्षांचे बाबा हरभजन सिंह यांचा अमृतसरमधील गुरुनानक देव हॉस्पिटलमध्ये मृत्यु झाला. पंजाबातील कोरोनाचे पहिले बळी बलदेव सिंह यांच्या संपर्कात ते आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली होती.