पक्ष पुर्नरचनेसाठी ‘या’ काँग्रेस नेत्याच्या घरी केले प्लानिंग

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेस अंतर्गत सुधारणांची आवश्यकता असल्यासंदर्भात पाच महिन्यांपूर्वी अनौपचारिक चर्चा सुरु झाली होती. खासदार शशी थरुर यांनी त्यांच्या निवासस्थानी डिनर आयोजित केला होता. त्यामध्ये पक्षांतर्गत बदलासंदर्भात चर्चा सुरु झाली होती. अनेक काँग्रेस नेते थरुर यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनरला हजर होते.

डिनरला उपस्थित असलेल्या बहुतांश नेत्यांनी सोनिया गांधींना सात ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली नाही. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिंदबरम, सचिन पायलट, अभिषेक मनू सिंघवी आणि मणिशंकर अय्यर डिनरच्या निमित्ताने झालेल्या या अनौपचारिक बैठकीला उपस्थित होते. पण त्यांनी पत्रावर स्वाक्षरी केली नाही. डिनरला आपणही उपस्थित असल्याची अभिषेक मनू सिंघवी यांनी पुष्टि केली. शशी थरुर यांनी मला डिनरचे आमंत्रण दिले होते.

पक्षामध्ये सुधारणांसदर्भात त्या बैठकीत अनौपचारिक चर्चा झाली. पण या पत्रासंबंधी मला काही माहित नव्हते असे सिंघवी यांनी सांगितले. डिनरच्या निमित्ताने झालेल्या त्या अनौपचारिक बैठकीमध्ये या पत्राची बीजे रोवली गेली. दरम्यान, पुढील तीन-चार महिन्यांमध्ये ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचीही निवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले. सोमवारी काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली.