अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधानपरिषदेवर पाठवा, काँग्रेसची मागणी

पोलीसनामा ऑनलाईन : राज्यपाल नामनिर्देशित 12 जागांचा तिढा महाराष्ट्रात सुटत नसताना मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील लाेकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे (renuka-shahane-legislative-council-congress-demand) यांच्या नावाची मागणी करून चर्चेचा धुरळा उडवला.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे काँग्रेसचे निरीक्षक एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना ट्विट करून जुन्नरकर यांनी ही मागणी केली आहे. जुन्नरकर यांच्या मते काँग्रेसने नेहमीच चांगल्या अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू यांना राज्यसभा, विधानसभेत पाठवून त्यांच्या कार्याचा बहुमान केला आहे. काँग्रेसकडे विधान परिषदेच्या 4 जागा आहेत. आजच्या परिस्थितीत राज्यपाल हे कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान यासंदर्भातच विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जेथे मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तेथे हम आपके है काैन चित्रपटामुळे लाेकप्रिय झालेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी बिनधास्त प्रतिक्रिया दिली आहे. खरी तुकडे तुकडे गॅंग तुमची आयटी सेल आहे,’ असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले हाेते, याची आठवण जुन्नरकर यांनी करून दिली. कंगना रनाैेत प्रकरणात त्यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्राची उत्तम बाजू मांडली होती. शहाणे यांना विधान परिषद मिळाल्यास त्या अजून जोमाने काम करतील व गरजूंना न्याय देतील. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांचे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव द्यावे, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठीकडे केल्याचे जुन्नरकर यांनी सांगितले.