3 लाखाचे लाच प्रकरण : पोलीस निरीक्षकाच्या परदेशवाऱ्या, कोरेगाव पार्क मध्ये ‘पॉश’ फ्लॅट, चेंबुर येथे 2 दुकाने, पोलीस कर्मचारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणुक प्रकरणात १० लाख रुपयांची लाच मागून त्यातील ३ लाख रुपये घेण्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांचा कोरेगाव पार्क या पुण्यातील सर्वात महागड्या परिसरात फ्लॅट असून चेंबुर येथे २ व्यावसायिक गाळे आहेत.

लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर त्यांच्या चाकण आणि मुंबईतील घराची तातडीने झडती घेण्यात आली. सध्या ते चाकण येथे भाड्याच्या घरात रहात आहेत. या घराची झडती घेतली असता तेथे पोलिसांना कोरेगाव पार्क येथील फ्लॅट व चेंबुर येथील २ गाळ्यांची कागदपत्रे मिळाली.
मुंबईच्या पथकाने त्यांच्या मुंबई येथील घराचीही झडती घेण्यात आली आहे. तिचा अहवाल अद्याप पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेला नाही.

या ठिकाणी भानुदास जाधव याचा पासपोर्टही आढळून आला आहे. त्यावरील नोंदी पाहिल्या असता त्यांनी अनेकदा परदेशी वारी केल्याचे आढळून आले आहे. आता परदेशी जाताना त्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी घेतली होती का हे तपासून पाहण्यात येणार आहे.

याप्रकरणी भानुदास जाधव व पोलीस कर्मचारी अजय भापकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, प्रत्यक्ष लाच स्वीकारणारा झिरो पोलीस अद्याप लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागला नाही.

सापळ्याचा थरार –
तक्रारदाराविरुद्ध फसवणूकीच्या गुन्ह्यात न्यायालयात क फायनल पाठविण्यासाठी जाधव यांनी १० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ३ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे शनिवारी ठरले होते. त्याप्रमाणे तक्रारदार हे पैसे घेऊन खराबवाडी रोडला आले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा लावला होता. जाधव यांनी पोलीस कर्मचारी अजय भापकर याला पैसे घेण्यास सांगितले.

भापकर याने झिरो पोलिसाला पैसे घेण्यास पाठविले व ते दुसऱ्या गाडीतून त्यांच्याबरोबर होते. झिरो पोलिसाने जीप चालू ठेवून तक्रारदाराकडून पैशाची बॅग घेतली व जीपमध्ये ठेवली. त्याचवेळी उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी क्लीनर साईटच्या दरवाजाचे हँडल पकडून त्याला पोलीस असल्याचे सांगितले. तरीही त्याने जीप तशीच पुढे नेली. त्यामुळे जीपबरोबर फरफटत जाऊन श्रीहरी पाटील हे जबर जखमी झाले होते. त्यानंतर तो झिरो पोलीस गाडी तशीच चालू ठेवून उडी मारुन पळून गेला. तेव्हा चालती जीप पाहून एका तरुणाने धाडसाने जीपमध्ये शिरुन ती थांबविली होती. त्यात श्रीहरी पाटील यांच्या पायांना जबर मार लागला आहे.

Visit : policenama.com