दिलासादायक ! भारतात उपलब्ध होणार अर्धा डझन ‘कोरोना’ वॅक्सीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने ( Corona Virus) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीचे संशोधन सुरु आहे. ही लस कधी येणार यावर आतापर्यंत अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत. भारतात देखील कोरोनाच्या लशीवर युद्धपातळीवर काम सुरू असून, त्याच्या मानवी चाचण्याही सुरू आहेत. भारतात एक-दोन नव्हे तर, सहा कोरोना लशी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येच ( Serum Institute of India) पाच लशीचं उत्पादन होत असल्याची माहिती आहे. या पाच लशींचे 100 कोटी डोस तयार करण्याचं काम सीरम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

सीरममध्येच पाच लशीचं उत्पादन
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ( Serum Institute of India) अनेक लसींचे उत्पादन सुरु आहे. यामध्ये ऑक्सफर्डच्या Covidshield सह Covovax, COVIVAXX, COVI-VAC, आणि सीरमच्याच COVAX या लशीचा समावेश आहे. त्याचबरोबर भारत बायोटेकच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला काल मंजुरी मिळाल्यानं भारतात एकूण सहा लशीचं उत्पादन सुरू झालं आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांना लस उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महिन्याला 3 लाख डोस
या इन्स्टिट्यूटमधून सर्वात पहिल्यांदा कोणती लस उपलब्ध होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला (Adar Punawala) यांच्या हवाल्याने नवभारत टाईम्सने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, ऑक्सफर्ड आणि अंत्राझेनका यांची कोविडशिल्ड ही लसच पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे. सध्या सिरममध्ये महिन्याला या लसीचे ३ लाख डोस तयार करण्यात येत आहेत. पुढील काळामध्ये हे उत्पादन ७ ते ८ लाखाच्या घरात वाढवले जाणार आहे. त्याचबरोबर सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘Covovax’या लशीचं उत्पादनही युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे.

रशियाच्या (Russia) लशीची भारतात चाचणी
ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रशियाने आपल्या स्पूटनिक-V या लसीची घोषणा देखील केली होती. त्याचबरोबर भारतात आता या लसीची 100 जणांवर ट्रायल घेतली जाणार आहे. जगभरात या लसीवर शंका उपस्थित केली जात होती. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी या लशीची घोषणा केली तसेच आपल्या मुलीला ही लस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारतात देखील लवकरच ही लस नागरिकांना उपलब्ध होणार आहे.