पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई ; ( पालघर ) पोलीसनामा ऑनलाईन – पालघर जिल्यातील सातपाटी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलालाला अटक केली असून त्याच्याविरोधात सातपाटी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सातपाटी पोलीस ठाण्यात दाखल झालेला अशा प्रकारचा बहुदा हा पहिलाच गुन्हा आहे. हा दलाल सातपाटी ब्राह्मणी पाडा येथील रहिवासी असून राजेश प्रभाकर मेहेर (वय 38) असे त्याचे नाव आहे. हे सेक्स रॅकेट उपविभागीय अधिकारी विकास नाईक, सातपाटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर तसेच पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील व कर्मचारी यांनी उघडकीस आणले.

आरोपीने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील चूनाभट्टी शिरगाव येथील इमारतीत एक सदनिका भाड्याने घेतली होती. या भाड्याच्या घरात तो हे सेक्स रॅकेट चालवत होता. महिलांना देहविक्री व्यवसायासाठी प्रवृत्त करून गेल्या चार ते पाच महिन्यापासून आरोपी सेक्स रॅकेट चालवत असल्याचा अंदाज आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सापळा रचत या ठिकाणी बनावट ग्राहकाला पाठवले. दलालाने या ग्राहकासाठी दिवा येथून एका महिलेला देहविक्रीचा व्यापार करण्यासाठी प्रवृत्त करुन आणले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी या सदनिकेत या दलालास हा व्यापार करताना रंगेहात पकडले. पोलिसांनी दलाल राजेश मेहेर याच्या मुसक्या आवळल्या व गुन्हा दाखल केला. सेक्स रॅकेटचं जाळं अजून पसरलं असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत हा अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही सापळा रचून डमी ग्राहक त्याठिकाणी पाठवला व त्यानुसार हा अनैतिक व्यापार उघडकीस आणला हा व्यापार चालवणार्‍या दलालास अटक केली आहे.पुढील तपास करीत आहोत अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी दिली आहे. या आधी ही पालघर जिह्यामध्ये च बोईसर दांडा या विभागात एका किराणा दुकानामध्ये देह व्यापार चालायचा पोलिसांनी तपास केल्यानंतर लक्षात आले की हा गैरव्यापार मागच्या ६ महिन्यांपासून चालू असून त्याच ठिकाणी एक मृतदेह पुरल्याची ही धक्कादायक घटना समोर आली. कारवाई दरम्यान पाच महिला आणि एका दलालास अटक केली होती.