बुरख्यात कॅमेरा लपवून ‘शाहीन बाग’मध्ये पोहचली ‘गैर’मुस्लिम महिला, आंदोलकांनी पकडलं (व्हिडिओ)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीच्या शाहीन बागमध्ये आंदोलनस्थळी सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. एका संशयित महिलेला बुरख्यात कॅमेरा ठेवून शुटींग करताना आंदोलनकर्त्या महिलांनी पकडले आहे. बुरखा घातलेली ही महिला आंदोलनकर्त्या महिलांना काही प्रश्न विचारत होती. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांना तिच्यावर संशय आला आणि तिची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये तिच्या जवळ कॅमेरा सापडला. यावरून येथे मोठा गदारोळ सुरू झाला.

आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस ताबडतोब आले आणि त्यांनी महिलेला ताब्यात घेतले. मिळालेल्या महितीनुसार या महिलेचे नाव गुंजन कपूर आहे, जी आपले युट्यूब चॅनल चालवते. आता पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहेत.

धरणे आंदोलन करणार्‍या महिलांचे म्हणणे आहे की, गुंजन कपूर नावाची महिला बुरख्यात कॅमेरा लावून व्हिडिओ शुटींग करत होती. तिच्याकडे याचे उत्तर नव्हते की ती बुरखा घालून का आली आणि लपून व्हिडिओ का बनवत होती. पोलिसांनी या महिलेच्याबाबतीत अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

मागच्या शनिवारी शाहीन बाग परिसरामध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. दिल्लीच्या शाहीन बागमध्ये फायरिंग करणारा तरूण कपिल गुर्जर यास पोलिसांनी रविवारी कोर्टासमोर हजर केले होते, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दिल्ली पोलीसांनी शाहीन बागमध्ये फायरिंग करणार्‍या गुर्जरची तीन दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु कोर्टाने केवळ दोनच दिवसाची कोठडी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहीन बाग फायरिंगच्या पाठीमागे घातपाताची शक्यता आहे का, तसेच यामध्ये कुणाचा हात आहे, याचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कपिल गुर्जरच्या रिमांडची मागणी केली होती.

शाहीन बागमध्ये मागील 45-50 दिवसांपासून नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन सुरू आहे. यापूर्वी जामिया नगरमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर गोळीबार करण्यात आला होता.