‘महाविकास’मध्ये शिवसेना बनतेय ‘पॉवर’फुल, ‘या’ मंत्र्यानं शिवबंधन बांधत केला जाहीर प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीत शिवसेना पक्ष आता पॉवरफुल बनत आहे. या पक्षात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आता अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तीन पक्ष एकत्र आल्याने महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. आता या आघाडीतील पक्षात अनेक राजकीय मंडळी प्रवेश करीत आहेत.

भाजपची सत्ता असताना भाजपमध्ये मेगाभरती झाली होती. यावेळी अनेक पक्षातील लोक भाजपमध्ये दाखल झाले होते. आता भाजपमधीलच काही नेते आता स्वगृह किंवा इतर पक्षात जाणार असल्याचे समजत आहे. यात राष्ट्रवादीचे काही नेते परतीच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू असताना शिवसेना पक्षात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील मातोश्रीवर शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे गडाख यांचा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे, असे मानले जात आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आले होते.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकल्यानंतर गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.

शंकरराव गडाख आणि मिलिंद नार्वेकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे गडाख यांनी निवडून येताच शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह नार्वेकर यांनी केला होता. त्यावेळी गडाख यांनीही शिवसेनेला पाठिंबा देणार आहे, असेही जाहीर केले होते.

आज अखेर शंकरराव गडाख यांनी आपला शब्द राखत शिवसेना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केलाय. अहमदनगर जिल्ह्यात गडाख कुटुंब हे राजकारणातील मात्तबर नेते आहेत. अहमदनगर शहरातील सेनेचे माजी मंत्री आणि उपनेते अनिल राठोड यांचे मागील आठवड्यात कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे निधन झाले. त्यामुळे या जिल्ह्यात शिवसेनेची मोठी पोकळी निर्माण झालीय.