‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि विजय शिवतारे यांची भेट

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप सुरूच आहे. आज त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar )यांची मुंबईत सिल्व्हर ओक ( Silver Oaks Bungalow) या निवासस्थानी भेट घेतली. कोरोनामुळे जर्जर झालेल्या पुरंदर तालुक्याची सर्व परिस्थिती पवार साहेबांच्या निदर्शनास आणून देत करावयाच्या उपाय योजनासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.

पवार साहेब यांनी याबाबत तत्काळ सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी यांना दूरध्वनी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या भेटीबाबत शिवतारे म्हणाले, सासवड येथील प्रशासकीय इमारतीत स्वच्छता, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा ताबडतोब करून तिथे कोविड सेंटर करण्याबाबत मी पवार साहेबांना विनंती केली. त्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पवार साहेब यांनी तत्काळ सूचना दिल्या. नीरा मार्केट कमिटीचा सासवड येथील बाजार सध्या कोरोनामुळे दिवे येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर स्थलांतरित करावा आणि सासवड व जेजुरी ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन (Oxygen) व व्हेंटीलेटर्स (Ventilator) उपलब्ध करून द्यावेत, रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर मिळाव्यात अशा विविध मागण्या मी केल्या होत्या. नीरा मार्केट कमिटीचा सासवड येथील घाऊक बाजार कायमस्वरूपी दिवे येथे उभारण्यासाठीच्या प्रस्तावास मी राज्यमंत्री असताना मंजूरी घेतलेली आहे, परंतु जागा हस्तांतरणासाठी महसूल विभागाने मार्केट कमिटीकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती. मार्केट कमिटी आर्थिकदृष्ट्या फारशी सक्षम नसल्याने ही जागा नाममात्र दरात द्यावी अशी मागणी मी पवार साहेबांकडे केली असता याबाबत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना ताबडतोब तशा सूचना दिल्या.

गुंजवणी या आपल्या ड्रीम प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. त्याच्या निधीमध्ये कोरोनामुळे कपात करू नये आणि प्रकल्पाला सहकार्य करावे अशी मागणीही यावेळी शिवतारे यांनी पवार साहेब यांच्याकडे केली. दरम्यान शिवतारे यांचे आगमन होताच पवार साहेब यांनी आस्थेवाईकपणे त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. शिवतारे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्यानंतर त्यांनी विविध कामांबाबत सर्व संबंधितांना फोनाफोनीही केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like