…तर आघाडी टिकू शकते, शरद पवारांचा काँग्रेसला इशारा

ADV
गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसच्या पुढाकाराने सध्या विरोधकांना एकत्र करून महाआघाडी केली जात आहे, परंतु ही आघाडी देशपातळीवर नव्हे तर राज्यपातळीवर होणे गरजेचे आहे. जो पक्ष ज्या राज्यात मजबूत आहे, त्याने मोठ्या भावाची भूमिका वठवावी. इतरांनी त्याला सहकार्य केले पाहिजे. अन्यथा ही आघाडी टिकणार नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारा परिषदेत बोलताना दिला. ते गोंदिया येथे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पत्रकरांशी बोलत होते.

रिलायन्स समूहाने गोंदिया जिल्ह्यातील डव्वा येथे बांधलेल्या कॅन्सर डे केअर सेंटरच्या उद्घाटनानिमित्त ते गोंदियात आले होते. पवार म्हणाले,  काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील ४० जागांबाबत चर्चा झाली आहे. उर्वरित आठ जागांसंदर्भात दोन्ही पक्षांच्या दिल्ली येथील बैठकीत मोठय़ा नेत्यांच्या उपस्थितीत निर्णय होणार आहे. नुकताच मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात आमच्या व शासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हे गंभीर दुष्काळाच्या कचाटय़ात सापडलेले आहेत.

राज्यातील धान, सोयाबीन, कापूस उत्पादक पूर्णपणे दैनावस्थेत अडकलेला आहे, पण राज्य व केंद्रातील सरकार महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भात गंभीर नाही, असा आरोपही पवार यांनी केला. या पत्रकार परिषदेला खासदार प्रफुल्ल पटेल व विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.