शरद पवार यांचं पुण्याच्या पोलीस आयुक्तांबद्दल मोठं वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणं मी वाचली आहेत. मी जर राज्यकर्ता असतो आणि सत्तेमध्ये असतो. तर एल्गार परिषदेतील लोकांवर ज्याने खटला भरला त्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं. त्यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. देशात घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का. असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित शिवगौरव शिवसन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील, लेखक प्रताप गंगावणे, अभिनेते शंतनू मोघे, शाहिर दादा पासलकर, विकास पासलकर इत्यादी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘एल्गार परिषदेतील लोकांची भाषणं मी वाचली आहेत. मला काही समजत नाही. या देशात, लोकशाहीमध्ये घटनेने आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. त्या मताशी तुम्ही सहमत नसाल तर त्याचं उत्तर देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्याच्याशी तुम्ही सहमत नसाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. अशा प्रकारची भाषणं केली. तशी भाषणं केली. त्यासाठी लोकांना तुरुंगात डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वोच्च न्यायालय या देशात आहे म्हणून तरी बरं आहे. कोर्टानं निकाल दिलेला असतानाही काही अधिकारी काही वेगळी कलमं लावता येतात का, काही वेगळी व्यवस्था करता येतील का या मताची असतात. हा सरासर सत्तेचा गैरवापर आहे. या गोष्टी चर्चा करून होत असतील तर तुम्हाला मला एकच विचार करावा लागेल. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही. पण काळ सोकावतो. असा काळ सोकावता कामा नाही. महाराष्ट्रात हे असं चालणार नाही. महाराष्ट्राचं प्रशासन या पद्धतीचं नाही हे ठणकावून सांगण्याची गरज आहे. त्यासाठी काळजी घ्यावी लागेल.’ असे ते यावेळी म्हणाले.