महाविकास आघाडीत राज्यसभेच्या ‘चौथ्या’ जागेसाठी रस्सीखेच !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यसभेच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत मतभेत पहायला मिळत आहेत. ही रस्सीखेच चौथ्या जागेसाठी असून हा तिढा कधी सुटतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन आपला अर्ज दाखल केला आहे.

राज्यातील जवळपास ७ जागांपैकी ४ जागांवर महाविकास आघाडी बाजी मारणार असे समोर येत आहे. दरम्यान या चार जागांपैकी २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असून फौजिया खान यांचे नाव देखील निश्चित करण्यात आले आहे. मात्र चौथ्या जागेसाठी काँग्रेस अडून बसल्याचे समोर आले आहे.

चौथ्या जागेवर कोणाची वर्णी लागू शकते याबाबत निर्णय आघाडीच्या समन्वय बैठकीत घेण्यात येणार आहे. शरद पवारांनी आज फक्त अर्ज भरला आहे. यावेळी शरद पवारांसोबत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अनिल देशमुख आणि अन्य काही राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार होते. दरम्यान १३ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून २६ मार्चला ही निवडणूक होणार आहे.