शरद पवार, उद्धव ठाकरे यांची अर्जुनासारखी अवस्था : संभाजी भिडे

पोलिसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाभारत युध्दावेळी अर्जुनाची जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था राममंदिर भूमिपूजनावेळी झाली असल्याचे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन उदय होत आहे, या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजी यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी काल माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसले तरी अयोध्याला जावे. त्यांना वेगळ्या निमंत्रणाची गरज नाही. राममंदिर उभारणीवरून ठाकरे आणि पवार यांची महाभारत युध्दावेळी अर्जुनाची जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था झाली आहे. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पवित्र सोहळ्याला विरोध करणे योग्य नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोना काळात उत्तम कामगिरी पार पाडत असून त्यांनी आता राज्यभर दौरा करून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. राम मंदिराचे भूमिपूजन हा गौरवाचा क्षण असल्याचे सांगत भिडे गुरुजी म्हणाले की, गेली 500 वर्षे राम मंदिर उभारणीचे प्रयत्न सुरू होते. आता हा प्रयत्न यशस्वी होत असताना राष्ट्रीय सणाप्रमाणे सर्व हिंदूंनी उत्सव साजरा करावा. कोरोनाचे संकट असले तरी दिवाळी, दसर्‍याप्रमाणे या दिवशी फटाके वाजवून हा सण साजरा केला जावा. प्रत्येक हिंदूने हा दिवस घरासमोर रांगोळी काढून आनंद साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले.