शार्प शुटर भरत कुरणे कोल्हापूर एसआयटीच्या ताब्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यातील शार्प शुटर भरत कुरणे याला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.

भरत कुरणे (व ३७) याने बेळगाव परिसरातील चिखले गावात अनेकांना बंदुक चालविण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचे कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आले. पत्रकार गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरुन कनार्टक पोलिसांनी ८ आॅगस्टला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याला अटक केली. त्याने परशुराम वाघमारेसह आणखी काही संशयितांनी चिखले येथे गोळीबाराचा सराव केला होता. याच परिसरात भरतचा धाबा होता. या धाब्यातून संशयितांना जेवण पुरविले जात होते. याबरोबरच भरतने काही जणांना आश्रय दिल्याचाही संशय कर्नाटक पोलिसांना होता. गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्या १२ जणांना कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या आरोपींचा डॉ. कलबुर्गी आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा संशय आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येत भरत कुरणे याचा सहभाग असल्याचे आढळल्याने कोल्हापूर एसआयटीने त्याला कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.