व्यावसायिकास पिस्तुलचा धाक दाखवत मागितली दीड कोटीची खंडणी, शिक्रापूर पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द FIR, शिरूर तालुक्यात खळबळ

शिक्रापूर – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील प्लॉटिंग व्यावसायिकाकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागत पिस्तुलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुधीर धुमाळ यांनी शिक्रापुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

या बाबतीत मिळालेल्या माहिती नुसार शिक्रापूर (ता. शिरूर) येथे प्लॉटिंग करणारे सुधीर धुमाळ यांनी त्यांच्या काही मित्रांसमवेत जमीन विकत घेत प्लॉटिंग केले, परंतु घेतलेल्या जमिनीचे मूळ मालकाच्या वारसदारांनी आक्षेप घेतल्याने त्या जमिनीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे, मात्र या जमिनीमध्ये पैसे न गुंतविता ज्याच्या ओळखीने जमीन घेतली ते पिंटू दरेकर हे वारंवार सुधीर धुमाळ यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करू लागले .यावेळी सुधीर धुमाळ यांनी जमिनीचा निकाल लागल्यानंतर जमीन विक्रीतून येणाऱ्या पैशातून पैसे देईल असे सांगितले , परंतु २५ जुलै रोजी सुधीर धुमाळ हे सोसायटीमध्ये बसलेले असताना त्यांना विशाल ढोले या युवकाचा फोन आला व त्याने सुधीर धुमाळ यांना सागर वर्पे यास तुमच्याशी बोलायचे आहे बाहेर रोडवर या असे सांगितले, त्यांनतर सुधीर धुमाळ हे बाहेर आले असता सागर वर्पे व विशाल ढोले हे त्याच्या जवळील बिगर नंबरच्या कार मधून तेथे आले त्यांनी सुधीर धुमाळ यांना गाडीत बसल्यास सांगितले, सुधीर धुमाळ गाडीत बसल्यानंतर सागर वर्पे याने सुधीर धुमाळ यांना आम्हाला पिंटूशेठ यांनी पाठविले असून पिंटूशेठ पार्टनर असलेल्या व तुम्ही प्लॉटिंगसाठी घेतलेल्या दोन्ही जमिनींचे मिळून दीड कोटी रुपये तू सहा महिन्यांमध्ये देण्यास तयार हो नाहीतर तुला फार महागात पडेल असे म्हणून सागर वर्पे व विशाल ढोले यांनी सुधिर धुमाळ यांना दमदाटी करण्यास सुरवात केली. यावेळी सागर वर्पे याने कमरेचे पिस्तुल काढून धुमाळ यांच्या पोटाला लावून तू जर पिंटूशेठ यांच्या सांगण्याप्रमाणे पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्यांना पाहून घेत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली, त्यांनतर धुमाळ यांनी घडलेला प्रकार त्यांच्या भावांना व इतरांना सांगून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले असताना रात्रीच्या वेळी राखाडी रंगाच्या ऑडी कारमधून सागर वर्पे व पिंटू दरेकर हे पोलिस स्टेशन मध्ये आले व त्यांनी त्यांची गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी करून गेटच्या आतमध्ये येऊन धुमाळ यांना आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर गोळ्या घालू अशी धमकी देत शिवीगाळ, दमदाटी केली आणि ते दोघे गाडीमध्ये बसून निघून गेले, याबाबत सुधीर संभाजी धुमाळ (रा. विशाल विश्व सोसायटी तळेगाव ढमढेरे. मूळ रा. पिंपळे खालसा ) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संतोष उर्फ पिंटू रभाजी दरेकर (रा. सणसवाडी), सागर वर्पे (रा. करंदी), विशाल ढोले (रा. विश्व सोसायटी, तळेगाव ढमढेरे, मूळ रा. जुन्नर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर व पोलीस नाईक तेजस रासकर हे करत आहेत.