5 दिवसांच्या आठवड्यामुळं शिवभोजन थाळ्या ‘शिल्लक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारने शासकिय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. तसेच राज्यात शिवभोजन थाळी सुरू केली. राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने शासकिय कार्यालये शनिवार-रविवार बंद रहात आहेत. याचा परिणाम कार्यालयाच्या परिसरात असलेल्या शिवभोजन योजनेच्या केंद्रावर झाला आहे. या दोन दिवसांमध्ये कार्यालयांना सुट्टी असल्याने केंद्रातील थाळ्या शिल्लक रहात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पाच दिवसांच्या आठवड्याचा फटका पुण्यातील शिवभोजन योजनेला बसल्याचे दिसत आहे.

या संदर्भात पुरवठा विभागाकडे तक्रारी आल्याने याबाबत राज्य सरकारला संबंधित केंद्रावरील थाळ्यांची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा सुरु करून काहीच दिवस झाले असून याचा फटका शिवभोजन थाळीला बसत आहे. शिवभोजन थाळी शिल्लक रहात असल्याच्या तक्रारी अनेक केंद्र चालकांकडून करण्यात येत आहेत. पुरवठा विभागाला काही दिवसांतच केंद्र चालकांकडून थाळी शिल्लक रहात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या केंद्रावरील थाळी कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये 26 जानेवारी पासून शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या ठिकाणी या योजनेचे केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पाच दिवसांचा आठवडा केल्याने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या थाळ्या शिल्लक रहात असल्याच्या तक्रारी केंद्र चालकांकडून पुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. तर स्वारगेट, मार्केटयार्ड या ठिकाणी थाळ्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

आठवड्याच्या सात दिवस हे केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, शासकिय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा केल्याने या ठिकाणच्या केंद्रावर थाळ्या शिल्लक रहात आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या थाळ्या कमी करून स्वारगेट आणि मार्केटयार्ड येथील थाळ्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.