भाजप-सेना खासदारांच्या मालमत्तेत ६० % वाढ ; ‘एडीआर’च्या अहवालातील निष्कर्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या भाजप-शिवसेना खासदारांची मालमत्ता सरासरी ३.२० कोटी रुपयांनी म्हणजेच ६० टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच अ‍ॅण्ड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स (एडीआर) ने सात मतदारसंघात निवडणूक लढवीत असलेल्या ११६ पैकी ११५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून निष्कर्ष जाहीर केले आहेत.

एडीआरच्या निष्कर्षानुसार पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ३३ उमेदवार कोट्याधीश आहेत. त्यांची सरासरी मालमत्ता दोन कोटी ३५ लाख रुपये इतकी आहे. १९ उमेदवारांविरुद्ध फोजदारी गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १० गंभीर स्वरुपाचे आहेत.

पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रांमध्ये जाहीर केलेली मालमत्ता आणि त्यापैकी २०१४ मध्ये निवडणूक लढविताना जाहीर केलेली मालमत्ता यांचे तुलनात्मक विश्लेशण एडीआरने केले आहे. एडीआरने केलेल्या विश्लेषणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. उमेदवारांची सांपत्तिक स्थिती व गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

भाजपच्या पाच उमेदवारांची सरासरी मालमत्ता १८ कोटी ९९ लाख रुपये आहे. तर शिवसेनेच्या दोन खासदारांची सरासरी मालमत्ता ९ कोटी ६२ लाख रुपये आहे. पॅन घोषित न केलेले उमेदवारांची संख्या १० असून उत्पन्नाचे स्त्रोत घोषित न केलेल्या उमेदवारांची संख्या ११ आहे. २०१४ मध्ये निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान सहा खासदारांची मालमत्ता पाच कोटी ३७ लाख रुपये होती. या खासदारांची २०१९ मधील मालमत्ता आठ कोटी ५७ लाख रुपये झाली आहे. त्यांच्या मालमत्तेमध्ये तीन कोटी २० लाख रुपयांची वाढ झाली असून याचे प्रमाण ६० टक्के आहे.