शिवसैनिकास ‘कोरोना’ ! शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील

पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेना भवनात येणार्‍या एका शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शिवसैनिक कोरोनाशी लढण्यासाठी मदतकार्य करत असून अनेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळेच एका शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाली असावी. त्यामुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येत आहे, असे शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले आहे.

संबंधित शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. शिवसेना भवनात नुकताच पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला होता. यावेळी शिवसेना भवनात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी होते उपस्थित होते.