शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे डॅशिंग नेते आणि सोशल मीडियात प्रसिद्ध असणारा चेहरा म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नितीन नांदगावकरांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

नितीन नांदगावकर हे आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध असून ते आपले आंदोलन सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णाला दिलेल्या अवाजवी बिलाबाबत आंदोलन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगावकर यांना अज्ञात नंबरवरून फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
नितीन नांदगावकर यांनी नेहरुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी मी शिवसेनेच्यावतीने हिरानंदानी रुग्णालयात जाऊन रिक्षा चालक कोरोना रुग्णाला दिलेले बिल कमी करण्यासाठी तसेच मृतदेह ताब्यात देण्याबाबत जाब विचारला होता. तेव्हा माझा तेथील सुरक्षा रक्षकांशी वाद झाला होता. त्यावेळी रुग्णालयाचे सीईओ सुदीप चटर्जी यांनी मला दम देऊन आठ लाख रुपये भरा आणि मृतदेह घेऊन जा, असे सांगितले होते.

त्यानंतर मी सदर रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यावेळी माझी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्कि झाली होती. दरम्यान सोमवारी सकाळी मला मोबाइलवर धमकी देणारा फोन आला. तसेच मला शिविगाळ देखील करण्यात आली, असा आरोप नितीन नांदगावकर यांनी केला आहे.