‘सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमध्ये इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी केंद्र सरकारने मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची सोय केली. याचसोबत मुंबईत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या कामगारांना घरी पाठवण्याची जबाबदारी उचलली. गेल्या काही दिवसांत सोनूने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून या कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवले आहे. सोशल मीडियावर सोनूच्या कामगिरीचे कौतुकही होत गेले. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’मधील लेखातून सोनूच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावे आहेत, आता यामध्ये सोनू सूदचे नाव घेतले जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरले. पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला.

भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खर्‍या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे. एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर मोबाईल नंबरसह एक मेसेज करा.

सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल, असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. अशी टीका राऊत यांनी केली आहे.