पडळकरांचे वक्तव्य भाजपाची ‘मन की बात’ तर नाही ना ? शिवसेनेचा टोला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर सर्वच स्तरातून पडळकर यांच्याविरोधात तीव्र भावना व्यक्त होत होत्या. दरम्यान, शिवसेनेनेही पडळकर यांच्या विधानावरून त्यांच्यावर आणि भाजपावर निशाणा साधला आहे. पडळकर यांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपाची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याच्या गुळण्या पडळकर यांनी टाकल्या. ‘पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहांना भडकवायचे आणि लढवायचे हे धोरण राबविले’, असे ते म्हणतात. ‘पवारांकडे विचारधारा नाही, व्हिजनही नाही आणि अजेंडा नाही’, असे मनाचे श्लोकही गोपीचंद यांनी म्हटले आहेत. गोपीचंद यांनी ही जी विधाने पवारांबाबत केली ती भाजपाच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे. सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके आहे हे माहीत होते, पण कच्चे मडके फुटकेदेखील आहे हे आता सिद्ध झाले. पडळकर यांनी पवारांबाबत केलेली विधाने वादग्रस्त आहेत. पवारांची ज्येष्ठता, अनुभव, व्यासंग, समाजकारण याचा गौरव पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा केला आहे. पवार यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठा मान आहे. पवार हे आपले गुरू असल्याचे मोदी यांनी न डगमगता सांगितले आहे. गोपीचंद हे आज भाजपाच्या बिळात शिरले आहेत. बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले.

पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपाविरोधात निवडणूक लढवली. ‘भाजपाला मत देऊ नका. मी भाजपासाठी कधी मत मागायला आलो तर जोड्याने मारा मला,’ असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपामध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार झाले. पण बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ आहे. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता.