‘मुख्य काश्मीरमध्ये तिरंगा फडकवता येत नाही ‘हा’ भाजपचा पराभव’ : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काश्मीरमध्ये (Kashmir) सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तिथं दिल्लीचा हुकूम चालतो. परंतु लाल चौकात तिरंगा फडकवणं हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यानंतर नक्की काय बदललं ? असा सवाल शिवसेनेनं (Shiv Sena) केला आहे. हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळ अर्थ असा होतो की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही. त्या भूमीवर दुसऱ्याचा कोणाचा तरी हुकूम चालतो. ते हुकूमबाज एक तर दहशतवादी किंवा परके आहेत असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

आजही मुंबईत तिरंगा फडकतोय म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जिथं पाकड्यांची मिजास चालते तिथच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीनं लाल चौकातील न फडकवलेल्या तिरंग्याच्या संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी आणि मर्दानी तिथंच आहे. काश्मीरमधून लेह, लडाख बाजूला काढलं. त्या लडाख काऊंसिलच्या निवडणुका भाजपनं जिंकल्या व त्याचा विजयोत्सव साजरा केला. परंतु मुख्य काश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

काँग्रेसच्या काळात कश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपनं परत मिळवलं हे जे सांगितलं जात आहे ते खरं असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला याचं उत्तर देशाला मिळायलाच हवं.

कलम 370 हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना काश्मीरच्या पोलिसांनी रोखलं व बंदी बनवलं. हे चित्र काय सांगतं ? म्हणजेच काश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही.