‘लश्कर ए होयबा’ने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधींना निकम्मे ठरवले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या पोस्टवर कडक कारवाई करणार्‍या फेसबुकने भाजपा नेते आणि संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. यावरून आता शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. 2014 मध्ये निवडणूक जिंकण्यात सोशल मीडियावर भाजपाच्या पगारी फौजांचे योगदान होते. त्याशिवाय ‘लश्कर ए होयबा’ने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधींना निकम्मे ठरवले, असा आरोप शिवसेनेने केला आहे. सामनाच्या संपादकीय मधून या प्रकरणावर टीका केली आहे.

देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही. सोशल मीडियावरील हे नवे ‘लश्कर ए होयबा’ राजकीय पक्ष व संघटनांचे पगारी नोकर असतात.

ते आपल्या विचारांचा प्रचार करतात तसे इतरांविषयी जहरही पेरत असतात. 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपाने मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यात भाजपाच्या समाज माध्यमांवर काम करणाऱया पगारी फौजांचे योगदान मोठे होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच राहुल गांधी यांना या गोबेल्स टोळीने साफ निकम्मे ठरवले. मनमोहन हे ‘मौनीबाबा’ तर राहुल गांधी यांना ‘पप्पू’ ठरवण्यात आले. त्याच वेळी मोदी हे सुपरमॅन, एकमेव तारणहार, विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे शिक्कामोर्तब समाज माध्यमांनी करून टाकले. गेल्या सात वर्षांत खोटयाचे खरे व खर्‍याचे खोटे करण्याचे प्रकार समाज माध्यमांतून उघडपणे झाले. अफवा तसेच जातीय-धार्मिक द्वेष पसरवून राजकीय लाभ उठवले गेले आहेत. अशी टीका शिवसेनेने केली आहे.