गिरीष महाजनांना ‘शह’ देण्यासाठी शिवसेनेला एकनाथ खडसेंची ‘गरज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर मुलीचा झालेला पराभव भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे नाराज झालेले एकनाथ खडसे यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनंतर मुंबईत येऊन त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, भाजप सोडण्यावर त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष खडसेंना आपल्यासोबत घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व असून त्यातच जळगाव जिल्ह्यात गिरिष महाजन यांचे वर्चस्व आहे. महाजन यांनी जळगावमध्ये शिवसेनेला फारसे यश मिळू दिले नाही. तर खडसे आणि महाजन यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. त्यामुळे महाजन यांना शह देण्यासाठी शिवसेनेला खडसे हवे आहेत. जळगावमधून विधानसभेला शिवसेनेने चार उमेदवार उभे केले होते. चारही उमेदवारांचा विजय झाला. मात्र, या उमेदवारांना पाडण्यासाठी महाजन यांनी बंडखोर उभे केले होते, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तेव्हापासून महाजन आणि शिवसेनेत वैर निर्माण झाले.

उत्तर महाराष्ट्र महाजन यांना शह देण्यासाठी आणि त्यांच्या सोबत दोन हात करण्यासाठी शिवसेनेला खडसेंची गरज असून त्यांच्या प्रवेशासाठी शिवसेना उत्सुक आहे. एकनाथ खडसे शिवसेनेत आले तर याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकत वाढू शकते. असे असले तरी खडसे यांनी आपले पत्ते उघड केले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने खडसेंनी राष्ट्रवादीत यावे यासाठी त्यांच्यासाठी पायघड्या टाकून ठेवल्या आहेत.

भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे हे कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, खडसे यांच्या समर्थकांना खडसे यांनी राष्ट्रवादीत जावे असे वाटत आहे. त्यामुळे खडसे यांच्यासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. आता मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर खडसे यांची दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/