मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक, विरार आणि त्यानंतर ठाणे येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर एक राज्याचा प्रमुख म्हणून त्याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणं अपेक्षित होत. मात्र, तसे झाले नाही. कोरोनामुळे राज्यात बिकट अवस्था निर्माण झाली असताना मुख्यमंत्री कोठेही दिसले नाही. किंबहुना अज्ञातवासात गेल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. एवढेच नाही तर सर्व सामान्यांच्या मनातही हा प्रश्न घर करून राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर एक वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत पर्यावरणमंत्री पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, कोठेही एखादी दुर्घटना घडली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे मेडिकल टीम, पोलीस, प्रसारमाध्यम काम करत असतात. अशा वेळी जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अन्य कोणी नेते मंडळी घटनास्थळी गेले तर तेथील मदतकार्याला अडथळे निर्माण होतात. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचं आहे त्यासंबंधी सूचना देत असतात. बऱ्याच वेळा वॉररूम मध्ये राहून सर्व कामकाज कस सुरू आहे हे पाहायचं असत, सध्याची परिस्थिती पाहता तर हेच अपेक्षित आहे. अशा शब्दांत विरोधकांच्या टिकेला उत्तर दिलं आहे.

केवळ आपल्याच राज्यात नाही तर सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून असे सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचं असत ते दोन्ही जागांवरील प्रमुख असतात असे सांगत आदित्य म्हणाले, जर आम्ही तिथे गेलो तर गोंधळ होतो. अर्धा पाऊण तास सर्व काही थांबलेलं असत तिथे बाईट दिल्यानंतर पुन्हा व्हीआयपी, टुरिझम सारखी टीका प्रसारमाध्यमातून होते. सांत्वन करण्यासाठी टीव्हीची गरज नाही तर त्या पीडित कुटूंबाशी बोलून मदत कशी मिळेल हेही पाहणे गरजेचे आहे. जिथे घटना घडते तेथील पालकमंत्री, ठराविक लोकप्रतिनिधी मदत करत असतात. एकत्र काम केल्याने प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते. असेही ठाकरे म्हणाले.