Loksabha : शिवसेनेला नांदेड मध्ये खिंडार ; तालुका संघटक काँग्रेसमध्ये

ADV

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेडमध्ये शिवसेनेला खिंडार पडले आहे. शिवसेनेचे निष्ठावान तालुका संघटक अशोक मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत चालेल्या बंडाळीला वैतागून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस प्रवेश केल्याने शिवसेनेला हा धक्का मानला जात आहे.

तीस वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे काम सुरु केले. शिवसेनेला पडत्या काळात साथ देणारे तालुका संघटक अशी अशोक मोरे यांची ओळख आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत बंडाळीमुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना कुठल्याही परिस्थितीत निवडूण आणण्यासाठी सर्व सहकाऱ्यांसह प्रयत्न करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. सर्व समावेशक नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याने त्यांच्यामुळेच जिल्ह्याचा विकास झाला असेही ते म्हणाले. एकट्या पडलेल्या अशोकासाठी दुसरा अशोक धावून आला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, विठ्ठल पावडे यांच्यासह आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.