शेतकरी आत्महत्या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे

उस्मानाबाद येथील जाहीर सभेत उध्दव ठाकरे यांचे भावनिक आवाहन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  आपल्याला भेटण्यासाठी मुंबईत आलेल्या शेतकर्‍याची भेट होवू शकली नाही. अन्यथा परवा झालेला अनर्थ टळला असता. त्यांना आपण भेटू शकलो नाही, त्यासाठी जाहीर माफी मागतो. मात्र एक वचन नक्की देतो, मयत दिलीप ढवळे यांचा जीव मी वाया जाऊ देणार नाही. या प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. सरकार आमचे आहे म्हणून आम्ही पोलीस अथवा न्यायव्यवस्थेवर दडपण आणणार नाही. ढवळे यांना जसा न्याय मिळायला हवा अगदी तसाच पवनराजे यांच्या मुलांनाही तो मिळायला हवा, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला भावनिक आवाहन केले.

महायुतीच्या प्रचारार्थ उस्मानाबाद शहरात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार ओम राजेनिंबाळकर, सोलापूर लोकसभेचे उमेदवार डॉ. जय सिध्देश्वर महाराज, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

ढवळे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची माहिती आपल्याला मिळाली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ओमराजे यांचे नाव आहे. मात्र या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशीअंती जो गुन्हेगार आहे, त्याला फासावर लटकवले पाहिजे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंगावर धावून येण्याची गरज नाही. शेतकर्‍यांच्या कर्जप्रकरणाची सर्व कागदपत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ओमराजे यांच्याकडून त्याबाबतची माहिती देखील जाणून घेतली आहे. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आपण भाजपासोबत युती केल्यामुळेच राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला आहे. त्यांच्या संघर्षयात्रेच्या चाकातील हवा आपल्या महायुतीमुळे निघून गेली आहे. त्यामुळे शरद पवार, जयंत पाटील तोंडाला येईल ती बडबड करीत सुटले आहेत. पंढरपूर येथील सभेत शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून आपण महायुतीत जाणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र आपण ज्या मागण्या भाजपासमोर ठेवल्या. त्या त्यांनी मान्य केल्यामुळे देशहितासाठी महायुतीचा पर्याय निवडला आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी अनेक चांगल्या योजना अंमलात आणल्या आहेत. मात्र यंत्रणा वठणीवर आणल्याखेरीज शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळणार नाही. खासगी कंपन्यांच्या दलालांनी पीक विम्याचे हप्ते गोळा केले आहेत. मात्र नुकसान भरपाई देताना शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात आहे. यंत्रणेतील ढिसाळपणामुळे शेतकर्‍यांची लूट होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपनीची कार्यालये असणे गरजेचे असल्याची मागणी आपण नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

रवी सर तुमची जबाबदारी माझ्यावर

अचानक उमेदवारी नाकारल्यामुळे उमरगा तालुक्यातील शिवसैनिकांत निर्माण झालेला राग शमविण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी व्यासपीठावरून रवींद्र गायकवाड यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. रवी सर मी आपल्याला शब्द देतो. आपले चिरंजीव आणि आपणास कधीच पश्चाताप होवू देणार नाही. आपल्या राजकीय भवितव्याची या पुढील जबाबदारी मी स्वीकारली असल्याचे उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

You might also like