एकत्र बसून पोलीस अधिकार्‍यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकार्‍यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत. कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले असून बाकी विरोधक काय बोलतात याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असे शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करत असल्याचा आरोप केला होता.त्यानंतर सामनामधून त्यांना उत्तर देण्यात आले आहे. मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले होते. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी सरकारचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेशी असतो, त्याबाबत व्यवहार चोख झाला आहे असे सांगता यावे अशा प्रकारे पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत असे शिवसेनेने म्हटले आहे. पोलीस दलात प्रथमच मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यावर विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे टीकेचे तुणतुणे वाजविले आहे.

चंद्रकांतदादा पाटील वगैरे नेत्यांनी त्याहीपुढे जाऊन टीकेच्या डफावर थाप मारत सांगितले आहे की, “थांबा, आता बदल्यांमागचा हिशेबच जाहीर करतो.” हिशेबाची वही आधीच्या सरकारने ठेवली असावी असे एकंदरीत पाटलांच्या विधानावरून दिसते.बदल्यांचा आदेश निघाल्यापासून विरोधी पक्षांचा गुदमरलेला श्वास पाहता सरकारने पोलिसांच्या बदल्या करून चांगलेच केले हे मानायला जागा आहे. यापैकी बहुतेक अधिकारी फडणवीस सरकारच्या काळात नेमलेले होते व सरकारने ‘शपथ’ घेताच या अधिकार्‍यांना तत्काळ बदलावे अशी जोरात मागणी असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात-आठ महिने कोणत्याही प्रमुख अधिकार्‍यास हात लावला नाही.