इंदापूर : उपकारागृहातील 16 कैद्यांना ‘कोरोना:ची लागण

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – इंदापूर येथील उपकारागृहात शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने कारागृहातील १६ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने उपकारागृहाच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ नुसार आणि साथ रोग कायदा, १८९७ नुसार शासनाच्या नियमांचा भंग केल्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य अ‍ॅड तुषार झेंडे पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात न आल्याने इंदापूर येथील उपकारागृहात २५ ऑगस्ट २०२० रोजी १७ कैद्यांना व दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. या बाबतची तक्रार झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे केली होती. त्यानंतर सर्व कैद्यांची रवानगी रुग्णालयामध्ये करण्यात आली होती. या बाबतीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून पोलीस उपमहानिरीक्षक कारागृह विभागाला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ नुसार कैद्याला देखील मानवाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. तसेच त्याला वेळेवर औषध उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे झेंडे पाटील यांनी याबाबतीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे कारवाईसाठी तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन ५ ऑक्टोबर २०२० रोजी देशातील सर्व राज्यांचे मुख्य सचिव यांना कारागृहामध्ये कोरोनाबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण इंदापूर येथील उपकारागृहात याचे कोणतेही पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे ३ मार्चला १६ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

इंदापूर उपकारागृहाच्या ठिकाणी कोरोना संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आली नाही, तसेच या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचा सुद्धा वापर करण्यात आला नाही. याबाबतीत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. त्यामुळे उपकारागृहाच्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि शासनाने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.