धक्कादायक ! ख्रिसमसनिमित्ताने दारु पिण्यासाठी 50 रुपये न दिल्याने केला खून 

मडगाव : पोलीसनामा ऑनलाइन – असं म्हणतात की व्यसन ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही. वेळ पडली तर कोणाचा जीव घ्यायलाही ते मागे पुढे पाहणार नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोव्यातील मडगाव शहरातील कंदब बसस्थानकाजवळील ही घटना आहे. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

शिवप्पा असं वय वर्षे 40 असणाऱ्या त्या मृत व्यक्तीचं नाव आहे. 38 वर्षीय ओमप्रकाश गणपत राय असं या आरोपी व्यक्तीचं नाव आहे. सदर व्यक्तीला फातोर्डा पोलिसांनीअटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. शिवाय त्याला उद्या (गुरुवारी) पुढील तपासाकरिता रिमांडासाठी न्यायालयात उभे केले जाणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. मुख्य म्हणजे फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आल्विटो रॉड्रगिस हे पुढील तपास करीत आहेत.

मृत शिवप्पा हा मूळ  कर्नाटकातील बेळगाव जिल्हयातील गोकाक येथील रहिवाशी आहे. तर आरोपी ओमप्रकाश हा मूळ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील मोहिआ या गावचा आहे. शिवप्पा आणि ओमप्रकाश हे दोघेही भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. दरम्यान संशयित म्हणून ओमप्रकाश याला अटक करण्यात आले होते. यानंतर  संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. उद्या त्याला न्यायालयात उभे केले जाणार आहे. भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली संशयितावर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.

नेमकी घटना काय ?
शिवप्पा याने ओमप्रकाश  राय याच्याकडून काही दिवसांपूर्वी 50 रुपये घेतले होते. अद्याप त्याने ते परतही केले नव्हते. राय याला हे पैसे परत हवे होते. मंगळवारी रात्री ख्रिसमसनिमित्त आपल्याला दारु प्यायची आहे असे सांगत त्याने शिवप्पाला पैसे देण्यासाठी आग्रह केला. काही कारणाने शिवप्पाने या गोष्टीसाठी नकार दिला. यामुळे राय भडकला. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. यानंत रात्री दोघेही झोपले होते. परंतु पहाटे पावणे चारच्या सुमारास राय अचानक झोपेतून उठला दारूच्या पैशांचा राग त्याच्या मनात होताच. यावेळी त्याने पाहिलं की  शिवप्पा हा गाढ झोपेत आहे. याच संधीचा फायदा घेत रायने जवळ असलेला एक दगड उचलला आणि झोपेत असलेल्या शिवप्पाच्या डोक्यात घातला आणि तो तेथून निघून गेला.  कंदब बसस्थानकाजवळील हायसेंथ अर्पाटमेन्ट येथे ही घटना ही घडली.

रायने दिली खुनाची कबुली

याच अपार्टमेंटजवळ एक बार आहे. या बारचे मालक संतोष गावकर यांनी काल सकाळी हा मृतदेह पाहिला आणि तात्काळ  फातोर्डा पोलिसांना कळवले. ही माहिती कळताच पोलीसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तपासकाम करताना भंगार गोळा करणाऱ्या काहीजणांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. यामध्ये रायदेखील होता. तपासाअंती रायने खून केल्याची कबुली दिली. अशी माहिती पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. विशेष म्हणजे अर्पाटमेन्टमध्ये बसविलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात संशयित राय याची छबी टिपली गेली होती.