जन्माष्टमी तिथीबद्दलचा सस्पेन्स संपला, जाणून घ्या कधी साजरा करायचा ‘श्रीकृष्ण’चा जन्मोत्सव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भगवान श्री कृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात भाद्रपद अष्टमी तिथीला झाला होता. त्यामुळे या कालावधीला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणतात. श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करून प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. जन्माष्टमीचा उपवास केल्यास संतान प्राप्ती, दीर्घायुष्य आणि भरभराट होते. मात्र यावर्षी जन्माष्टमी तिथीबद्दल लोक बरेच संभ्रमित आहेत. काही लोक ११ ऑगस्टला तर काही १२ ऑगस्टला जन्माष्टमी धरून चालत आहेत.

ज्योतिषाचार्य कमल नंदलाल म्हणतात की, ११ आणि १२ ऑगस्ट अशा दोन्हीही दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाईल. मात्र जन्माष्टमी उपवास करणार्‍या लोकांना एका विशिष्ट गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणतात की, वैष्णव आणि स्मार्त दोन वेगवेगळ्या दिवशी जन्माष्टमी साजरी करतात.

मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी स्मार्त समाजातील लोक जन्माष्टमी साजरे करतील. म्हणजे विवाहित लोक, कौटुंबिक किंवा घरातील लोक जन्माष्टमी उपवास ठेवतील. तर बुधवार १२ ऑगस्ट रोजी उदया तिथीनिमित्त वैष्णव लोक जन्माष्टमी साजरे करतील. १२ तारखेलाच मथुरा आणि काशीतील सर्व मंदिरांमध्ये जन्माष्टमी होईल.

११ ऑगस्ट रोजी सूर्योदयानंतरच अष्टमी तिथीला सुरुवात होईल. अष्टमीची तिथी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०६ वाजता सुरू होईल. ही तिथी १२ ऑगस्टपर्यंत सकाळी ११:१६ पर्यंत असेल. वैष्णव जन्माष्टमीसाठी १२ ऑगस्टचा शुभ मुहूर्त सांगितला गेला आहे. बुधवारी रात्री १२.०५ ते दुपारी १२.४७ पर्यंत श्री कृष्णाची पूजा केली जाऊ शकते.

श्री कृष्ण जन्माष्टमीमध्ये अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राकडे विशेष लक्ष दिले जाते. जेव्हा हे दोन योग एकत्र येतात, तेव्हा जयंती योग तयार होतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर सामान्य वर्गातील लोक ११ ऑगस्टलाच जन्माष्टमी साजरी करतील. तर १२ ऑगस्ट रोजी वैष्णव, संत किंवा बैरागी लोक जन्माष्टमी साजरे करतील.

कशी साजरी करायची जन्माष्टमी?

पहाटे अंघोळ करा आणि उपवास किंवा पूजेचा संकल्प करा. दिवसभर पाण्याचे किंवा फळांचे सेवन करा. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाची धातूची मूर्ती एका पात्रात ठेवा. त्या प्रतिमेवर प्रथम दूध, दही, मध, साखर आणि शेवटी तूप लावून स्नान घाला, यालाच पंचामृत स्नान म्हणतात.

यानंतर पाण्याने स्नान घाला. त्यानंतर पीतांबर, पुष्प आणि प्रसाद अर्पण करा. उपासकांनी काळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करू नये. यानंतर आपल्या इच्छेनुसार मंत्राचा जप करा. शेवटी प्रसाद घ्या आणि त्याचे वाटप करा.