लॉकडाऊमध्ये मुलांच्या मानसिक स्थितीत लक्षणीय बदल, सर्व्हेक्षणातून माहिती समोर

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –    सांगली जिल्ह्यामध्ये महापूर, लॉकडाऊन आणि सध्याची कोरोनाची स्थिती याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या मानसिक स्थितीवर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील ‘शश्रुषा’ सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या मानसतज्ज्ञांनी जिल्ह्यातील पंधरा वर्षापर्यंतच्या एकूण 8892 मुला-मुलींच्या मानसशास्त्राचा अभ्यास व सर्वेक्षण केले. यात तीव्र स्वरूपाच्या मानसिक, भावनिक, वर्तवणूक, शैक्षणिक समस्या असणाऱ्या मुलांमधील विविध मानसिक व मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेण्यात आला.

या सर्वेक्षणामध्ये 85 टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, 57 टक्के राग व अती संताप, 52 टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर 51 टक्के मुलांमध्ये सर्वाधिक अतीचंचलतेचे प्रमाण असल्याचे दिसून आले असल्याची माहिती शुश्रुषा संस्थेचे अध्यक्ष मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली. मार्चपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन काळात 85 टक्के मुलांचा चिडचिडेपणा वाढला असून 57 टक्के मुले रागीट बनली असल्याचे समोर आले आहे. या संस्थेने जिल्ह्यातील 102 गावातील मुलांची पाहणी केली.

या संस्थेने 102 गावातील 8892 मुलांशी संवाद साधला. यामध्ये कोरोनाची भीती, घरातील दडपण, टाळेबंदीमुळे व्यक्त होण्यात आणि खेळण्या-बागडण्यावर आलेले निर्बंध या साऱ्यांचा विचार करत मुलांचे भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संस्थेने मुलांच्या विविध मानसिक आणि मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेतला. यामध्ये मुलांमधील मानसिक, भावनिक वर्तमान तीव्र स्वरुपात बदल झाल्याचे लक्षात आले. या संशोधनात्मक सर्वेक्षणाबाबत तज्ज्ञ व प्रशिक्षित 25 मानसोपचारतज्ज्ञांनी सहभाग घेतला. या तज्ज्ञांनी 9 हजार 85 कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पालक व मुलांशी संवाद साधला.

लॉकडाऊनमध्ये मुलांमध्ये झालेले बदल

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात मुलांमध्ये अकारण भीती, वारंवार रडणे, कमी झोप, मुलांमध्ये न मिसळणे, अंथरूण ओले करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, बोलताना अडखळणे, हातपाय थरथरणे, अकारण डोके व पोटदुखी अशा अनेक भावनिक, मनोशारीरिक तक्रारीसोबतच चिडचिडेपणा, अतिचंचलता, राग व अतिसंताप, एकाग्रतेचा अभाव, लक्षात न राहण्याच्या समस्या दिसून आल्या आहेत.