निलेश राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंधुदुर्ग – रत्नागिरीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी आणि ही जागा राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे , अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नाही तर , जर ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला दिली तर जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावी असाही प्रस्ताव असल्याचे समजत आहे.
काँग्रेसने रावेरची जागा माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीकडे मागितली आहे. याच जागेच्या बदल्यात सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता आहे. रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे या खासदार आहेत. तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा शिवसेनेचे विनायक राऊत यांच्याकडे आहे.

निलेश राणे यांनी 2009 ला याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती . यात त्यांनी विजय मिळवला होता . परंतु 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव करत ही जागा जिंकली होती . निलेश राणे हे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य असलेले नारायण राणे यांचे पुत्र आहेत. जर निलेश यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर नारायण राणे काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.