जिल्हा शासकीय रूग्णालयातील डायलिसीसचे सहा यंत्र चार दिवसांपासून बंद

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –  जिल्हा शासकीय रूग्णालयातील डायलिसीसचे सहा यंत्र चार दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दररोज उपचार घेणार्‍या बारा रूग्णांची त्यामुळे गैरसोय होत आहे. शहरातील दोन खासगी रूग्णालयातून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डायलिसीस यंत्रासाठी लागणारे निर्जंतूक पाणी तयार करणार्‍या पाण्याच्या आरओ फिल्टर यंत्रणेला जंतूसंसर्ग झाल्यामुळे चार दिवसांपासून जिल्हा शासकीय रूग्णालयातील डायलिसीस यंत्रणाच व्हेंटीलेटरवर आहे. आरोग्य विभागाचे तीन अभियंते दुरूस्तीसाठी प्रयत्नरत असून लवकरच यंत्रणा पुर्ववत सुरू होईल, असे रूग्णालयाच्यावतीने सांगीतले जात आहे.

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये गरीब रूग्णांना मोफत डायलिसीस सुविधा दिली जाते. या महत्वपूर्ण सुविधेमुळे जिल्हाभरातील किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांचा ओघ वाढला आहे. मात्र 30 एप्रिल रोजी अचानक जिल्हा सामान्य रूग्णालयातील सर्व डायलिसीस यंत्र अचानक बंद करण्यात आली आहेत. अत्यावश्यक असलेली डायलिसीस सेवा अचानक बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या नियमित रूग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. काहींची प्रकृती अचानक खालावल्याने खासगी रूग्णालयाचा आधार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जिल्हा रूग्णालयात एकूण सहा डायलिसीस यंत्रे आहेत. या यंत्राद्वारे रूग्णांच्या शरीरातील पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी निर्जंतूक पाणी वापरले जाते. हे पाणी निर्माण करणार्‍या आरओ फिल्टर यंत्रणेलाच जंतूंचा प्रार्दूर्भाव झाला आहे. त्यामुळे डायलिसीस रूग्णांना थंडी, ताप, अशी लक्षणे दिसून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रशासनाने सर्व डायलिसीस यंत्रे मंगळवारपासून अचानक बंद ठेवले आहेत. सध्या रूग्णालयात दोन शिफ्टमध्ये बारा रूग्णांवर डायलिसीस उपचार सुरू आहेत. त्यांना अचानक विनामुल्य डायलिसीस यंत्रणा बंद पडल्यामुळे खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागला आहे. रूग्णालयातील डायलिसीस यंत्रांचे मूल्यमापन (ऑडीट) सातत्याने न केल्यामुळेच हा जंतूसंसर्ग झाला असल्याची भावना रूग्णांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत. एकाचवेळी सर्व यंत्रे ठप्प पडल्यामुळे रूग्णांची गैरसोय तर डायलिसीस यंत्र व्हेंटीलेटरवर अशी परिस्थिती सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात निर्माण झाली आहे.

लवकरच सुविधा पुर्ववत होईल
डायलिसीस उपचाराकरिता लागणार्‍या जिल्हा शासकीय रूग्णालयातील आरओ फिल्टर यंत्रणेला जंतू प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे या सर्वच सहा मशीन 30 एप्रिलपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने आरओ फिल्टर युनिट दुरूस्त करण्यासाठी पुणे येथील तीन अभियंते दाखल झाले आहेत. वेळेत बिघाड दुरूस्त झाल्यास शनिवारपासून डायलिसीस सुविधा पुन्हा पुर्ववत सुरू होईल. तोपर्यंत शहरातील सुविधा आणि सह्याद्री या खासगी रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रूग्णांवर विनामुल्य उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.