रात्री चांगली झोप हवी आहे का ? मग ‘या’ पाच पद्धतींनी झोपूनच पाहा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी चांगली झोप खूप महत्वाची ठरते. यासाठी चांगली झोप लागण्यासाठी झोपण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. चांगली झोप लागण्यासाठी आणि आरोग्यासंबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी आपण झोपण्याच्या पाच पद्धतींची माहिती घेणार आहोत.

पहिली झोपण्याची पद्धत म्हणजे सरळ पाठीवर झोपणे होय. पाठीचे दुखणे असेल तर सरळ पाठीवर झोपल्यास आराम मिळतो. जेव्हा पाठीवर सरळ झोपता त्या वेळी एक उशी आपल्या गुडघ्यांच्या खाली आणि एक उशी पाठीखाली घ्या. यामुळे पाठीच्या कण्याला आधार मिळतोे आणि दुखणे कमी होते.

झोपेची दुसरी पद्धत म्हणजे डोके उंच ठेवणे. सायनसची समस्या असल्यास डोक्याखाली जाड उशी घ्यावी. यामुळे डोके उंच राहील आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही. कारण झोपल्यावर म्युकस सायनसमध्ये जमा होतो. जर तुमचे डोके वर असेल तर झोपल्यावर योग्य प्रकारे श्वास घेता येईल. शिवाय तोंडातून लाळ गळणार नाही. अ‍ॅसिडिटी, घोरणे, हृदयासंबंधी आजार, लठ्ठपणा आणि सुरकुत्यांपासून बचाव करण्यासाठी योग्य प्रकारे झोपणे महत्वाचे आहे.

तिसरी पद्धत म्हणजे डोक्याची हालचाल कमी करणे. अनेकांना डोकेदुखी किंवा अर्धशिशीचा त्रास होतो. झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे देखील हा त्रास होतो. यासाठी झोपताना स्थितीकडे लक्ष ठेवले तर ही समस्या बरी होऊ शकते. ही समस्या असल्यास डोक्याची हालचाल कमी करावी. यासाठी सरळ झोपावे आणि डोक्याच्या आसपास तीन उशा लावाव्यात. जेणेकरून डोक्याची स्थिती स्थिर राहील. नेहमी सुती उशीचा वापर करावा.

चौथी पद्धत आहे पायांमध्ये उशी घेणे. मासिक पाळीदरम्यान महिलांना पाय आणि पाठीत दुखते. यातून आराम मिळावा यासाठी गुडघ्यांमध्ये उशी ठेवून झोपावे. यामुळे कंबरदुखी आणि पायात गोळे येण्याचा त्रासही कमी होतो. गर्भवती महिलांनी अशाप्रकारे झोपणे फायदेशीर असते. सांधेदुखीची समस्या असणारांना या स्थितीत झोपू नये. त्यांनी असे झोपल्यास दुखणे वाढण्याची शक्यता असते. पालथे झोपायची सवय असेल तर पोटाखाली मऊ उशी ठेवून झोपण्याचा प्रयत्न करावा.

झोपण्याच्या पद्धतीचा पाचवा प्रकार म्हणजे डाव्या कुशीवर झोपणे. रात्री उशिरा जेवण करून झोपल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. झोपण्याच्या स्थितीत थोडा बदल केल्यास या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी डाव्या कुशीवर झोपावे. जास्त जाड किंवा मऊ उशीचा उपयोग करू नये. गरोदरपणात डाव्या कुशीवर झोपणे जास्त फायदेशीर असते. गरोदर महिला अशाप्रकारे झोपल्यास शिशूचा रक्तप्रवाह वाढवण्यास मदत होते.